आसाममधील धक्कादयक घटना उघड
दारांग (आसाम) : आसामच्या दारांग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस स्टेशनमध्ये एका गर्भवती महिलेसह तिच्या दोन बहिणींना विवस्र करुन बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या मारहाणीमुळे संबंधित महिलेचा गर्भपातही झाला. याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या तीनही पीडित बहिणींच्या भावासोबत एक महिला काही दिवसांपूर्वी पळून गेली होती. पळून गेलेले हे दोघेही भिन्न धर्मीय आहेत. पळून गेलेल्या महिलेच्या कुटुंबियांनी तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. याची चौकशी करण्यासाठी पळून गेलेल्या पुरुषाच्या तीन बहिणींना चौकशीसाठी पोलीस जबरदस्तीने ठाण्यात घेऊन गेले होते. या घटनेबाबत पीडित महिलांनी 10 सप्टेंबर रोजी दारांग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आरोप केला की, 8 सप्टेंबर रोजी पोलिसांनी या तिघा बहिणींना जबरदस्तीने बुरहा पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर पोलीस ठाण्यात रात्रभर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
पीडित महिलांनी सांगितले की, पोलिसांनी आम्हाला अमानुषपणे मारहाण केली. तसेच आम्हाला विवस्त्रही केले गेले. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने आमच्या गुप्तांगांनाही स्पर्श केला. तसेच एका गर्भवती बहिणीच्या पोटात या अधिकाऱ्याने जोरात लाथ मारल्याने तिला रक्तस्राव होऊन गर्भपात झाला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येऊ नये म्हणून, त्याने आम्हाला पिस्तुलाचा धाकही दाखवला. दरम्यान, या मारहाणप्रकरणी बुरहा पोलीस ठाण्यातील एका प्रभारी अधिकाऱ्यासाह एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असून याची चौकशीही सुरु करण्यात आली आहे.