जिल्ह्यात 10 ठिकाणी राहणार महिलांकडे नगराध्यक्ष पद ; महापालिकेतून वगळलेल्या गावांत पहिल्यांदाच निवडणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. यानुसार फुरसुंगी आणि उरळी देवाची या दोन गावांच्या नव्याने स्थापन होणाऱ्या नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्ग राखीव ठेवण्यात आले आहे. राज्य शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये अधिसूचना जारी करीत पुणे महापालिकेच्या हद्दीतून ही दोन गावे वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची घोषणा केली होती. या गावांत प्रथमच नगरपरिषद निवडणूक होत आहे.
या गावांचा पहिला नगराध्यक्ष आहे अनुसूचित जाती प्रवर्गमधून निवडला जाणार असल्याने प्रबळ उमेदवार देताना राजकीय पक्षांची मोठी कसोटी असणार आहे.नगराध्यक्षपदाची सोडतीनुसार पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदांपैकी ४ ठिकाणी आणि ४ नगरपंचायतींपैकी 3 ठिकाणी नगराध्यक्षपद महिलांकडे जाणार आहे. तसेच, दोन ठिकाणी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद राखीव राहणार आहे.
आठ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदे ही सर्वांसाठी खुली राहणार आहेत. आपल्या शहरातील नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या आरक्षण सोडतीमुळे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच बुधवारी (दि. 8 )यासर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात सात महिला नगराध्यक्षा..
पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर आणि जुन्नर येथील नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव राहणार आहे. तर, चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असेल. त्यामुळे या चार नगरपरिषदांमध्ये महिला नगराध्यक्षा असतील. जिल्ह्यात मंचर, माळेगाव आणि वडगाव मावळ या नगरपंचायतींच्या निवडणुकाही होणार आहेत. यापैकी मंचर नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी राखीव राहील, तर वडगाव मावळ नगरपंचायतींची नगराध्यक्षपदे खुल्या प्रर्वगातील महिलेसाठी खुले राहणार आहे. माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव राहणार आहे
देहू नगराध्यक्षपद आरक्षणही जाहीर..
देहू नगरपंचायतीचा कार्यकाळ अजून १४ ते १५ महिने बाकी आहे. जानेवारी २०२७ मध्ये तो संपणार आहे. त्यामुळे यावर्षी देहू नगरपंचायतीची निवडणूक होणार नाही. मात्र, त्यावेळी वेगळी प्रक्रिया राबविण्याऐवजी आताच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. देहू नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे.
नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले…
राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, बारामती, तळेगाव-दाभाडे, सासवड, भोर आणि इंदापूर या नगरपरिषदांची नगराध्यक्षपदे सर्वांसाठी खुली राहतील.





