Rajgurunagar accident : विठ्ठलाचं नामस्मरण करत होत्या महिला; पण काळाने घातली झडप; दुर्देवी टेम्पो अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर

Rajgurunagar accident : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर येथील शिवमंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली. सोमवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नागमोडी वळणावर घाट चढताना टेम्पो रिटर्न आल्याने तो ८० फूट खोल दरीत कोसळला आणि मोठा अपघात झाला.
या दुर्देवी अपघातात 10 महिलांचा मृत्यू झाला असून, 25 ते 30 महिला जखमी झाल्या आहेत. आता या अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी पिकअप गाडीत महिला गाणी म्हणत, हसत-खेळत कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. भक्तीभावाने सुरू असलेला हा प्रवास काही क्षणात शोकसागरात बुडाला अन् होत्याच नव्हतं झालं. या व्हिडीओत टेम्पोतील महिला विठ्ठलाच्या नामस्मरात दंग असल्याचं दिसत आहे.
महिलांना अश्रू अनावर
या भीषण अपघाताची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातास्थळावरील दृश्य मन हेलावून टाकणारं होतं. अपघातस्थळावर जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा खच, चपलांचा ढीग होता. आपल्या शेजारणीचा मृतदेह पाहून महिलांना अश्रू अनावर झाले होते.
देवाचं नामस्मरण आणि भजनं म्हणत हसत-खेळत प्रवास, पुण्यातील पिकअप अपघातापूर्वी शेवटचा व्हिडिओ, दहा महिलांनी गमावले प्राण#पुणे #खेड #Pune #Khed #Accident pic.twitter.com/oKv16YYsVr
— Anish Bendre (@BendreAnish) August 12, 2025
मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, आता मृतांचा आकडा वाढला असून मिळालेल्या माहितीनुसार १० महिलांचा मृत्यू झाला आहे, तर ३० पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
नेमका अपघात कसा घडला?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा टेम्पो कुंडेश्वर येथील शिवमंदिराच्या दर्शनासाठी ३५ हून अधिक भाविकांना घेऊन जात होता, यामध्ये बहुतांश महिला भाविक होत्या. अपघाताच्या वेळी वाहनाने ५ ते ६ पलट्या खाल्ल्या, ज्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. १० रुग्णवाहिकांचा वापर करून बचावकार्य राबवण्यात आले.
वारंवार घटना घडत आहेत
खेड पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग, चालकाचा निष्काळजीपणा किंवा रस्त्याच्या परिस्थितीमुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता आहे. नागमोडी वळणांवर आणि घाटरस्त्यांवर अशा घटना वारंवार घडत असल्याने, रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ १४ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या अपघातात ५ महिलांचा मृत्यू आणि १३ जण जखमी झाले होते, ज्यामुळे या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





