महिलांनी सर्व क्षेत्रात ठसा उमटवावा : उमा भारती

एमआयटीतर्फे आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय महिला संसदेचे उद्घाटन
पुणे – देशात अशी आर्थिक स्थिती निर्माण करावी की जेणे करून येथील कोणतीही महिला पुरुषासमोर पैशासाठी हात पसरविणार नाही. महिला या ऊर्जेचा स्त्रोत असल्याने त्यांना कमकुवत समजू नका. महिलांनी कुटुंबाची काळजी घेत सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, असे उद्गार भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे दुसऱ्या राष्ट्रीय महिला संसदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. ही संसद 14 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री देवाश्री चौधरी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय आदिवासी कामकाज राज्यमंत्री रेणुका सिंग, नृत्यंगणा डॉ. मल्लिका साराभाई, पार्श्वगायक कैलास खेर आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा रितू छाब्रिया यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड हे होते.
रितू छाब्रिया म्हणाल्या, या संसदेत नवीन शिकण्यासाठी खूप काही आहे. भारत हा प्रगतीशील देश असून आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती करीत आहे. समाज उन्नतीसाठी शिक्षण हे सर्वांत महत्त्वाचे आहे.
डॉ. विश्वनाथ कराड यांनी महिलांना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण केल्यास देशाचा विकास होणार असल्याचे नमूद केले. राहुल कराड यांनी समाजनिर्मितीसाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. डॉ. अदिती कराड यांनी आभार मानले.





