संतापजनक ! लाडकी बहीण योजनेसाठी दाखला आणायला गेलेल्या तरुणाला सरपंचाने लगावली कानाखाली

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात याची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट लाभार्थी महिलांच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे. यासाठीच बहिणीचा दाखला आणायला गेलेल्या तरुणाला गावच्या सरपंच महिलेने कानाखाली लगवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सरपंच महिलेविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेसाठी दाखले, कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यातच तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणल्याची घटना घडली. हिराबाई नीलमचंद पंधरे मारहाण करणाऱ्या सरपंच महिलेचे नाव आहे.
आशिष सुभाष लंजे (वय 20) हा युवक दाखला मागण्यासाठी गेला होता. त्याला पैशाचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणली. आशीष लंजे हा नवेगावबांध येथील रहिवाशी आहे. तो नवेगावबांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्यावतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डनवरती काम पाहत होता. तो येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे काम करत होता. काही दिवसाआधी आशिष लंजे याला कामावरून काढण्यात आले होते.
आशिष सुभाष लंजे याने सरपंच सौ.हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे तक्रार नोंदवली असून (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115(2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चौकशी केली असता सौ.हिराबाई पंधरे यांनी आशिषने पैशांचा हिशोब न दिल्याने कानशिलात लगावल्याचे मान्य केले आहे. नवेगाव बांध पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





