खेळांमध्ये महिलांना सर्वाधिक प्रोत्साहन – क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड

जयपूर – विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व आणित्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा आम्हा सर्वांचा निर्धार आहे. हे 140 कोटी भारतीयांचे जुने स्वप्न आहे, जे नक्कीच पूर्ण होईल. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकार महिलांना सर्व प्रकारच्या खेळांमध्ये सर्वाधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन केंद्रिय क्रीडा मंत्री आणि ऑलिम्पिक पदक विजेते (कर्नल) राज्यवर्धन राठोड (Sports Minister Rajyavardhan Rathore) यांनी केले आहे.येथे सुरु असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये एका चर्चासत्रात राठोड बोलत होते.
खेलो इंडिया आणि टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टाॅप्स) यामुळे देशाचे क्रीडा संस्कृतीचे चित्र पालटत असल्याचे सांगून राठोड पुढे म्हणाले की, सुविधा आणि सन्मान यासाठी खेळाडूंना प्रेरीत करण्याचे काम खुद्द पंतप्रधान मोदी करत आहेत. खेळामुळे इच्छाशक्ती मजबूत होते, एकाग्रता वाढते आणि लक्ष्य स्पष्ट होते. व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्र उभारणीत खेळांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच टाॅप्स योजनेंतर्गत आज शेकडो खेळाडू देश-विदेशात प्रशिक्षण घेत आहेत.
मोदी सरकार देशातील तरुण-तरुणींना खेळाकडे येण्यासाठी प्रवृत्त करत आहे आणि त्यांना उच्चस्तरीय पायाभूत सुविधा आणि उच्चस्तरीय प्रशिक्षण प्रदान करत आहे. मोदी सरकार महिला शक्तीला खेळासाठी प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे ऑलिम्पिक खेळांमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग वाढत आहे आणि चांगले परिणाम समोर येत आहेत. भारतीय महिला क्रीडा विश्वात भारताचा झेंडा फडकवत आहेत, असेही राठोड म्हणाले.





