लोणावळा रेल्वे रुळाजवळ गुलाबी सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; हत्येचा संशय

लोणावळा : मुंबई-पुणे लोहमार्गावर एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे रुळाजवळ बेवारस पडलेल्या एका संशयास्पद गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेमार्गावर कर्जत आणि लोणावळा दरम्यान स्टेशन ठाकूरवाडी येथे किलोमीटर क्रमांक ११२ याठिकाणी हा प्रकार समोर आला. एका रेल्वे प्रवाशाचे लक्ष या सुटकेसकडे गेले आणि दुर्गंधी आल्याने त्यांनी तातडीने याबाबत प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर लोणावळा रेल्वे पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुटकेस उघडली असता, आत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये टाकून रेल्वे रुळाजवळ फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. लोणावळा रेल्वे पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला आहे. अधिक तपास लोणावळा रेल्वे पोलीस करत आहेत.





