महाराष्ट्र हळहळला..! धावत्या बसमधून महिलेची उडी; चाकाखाली येऊन डोक्याचा झाला चेंदामेंदा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील धुळे-सोलापूर रोडवर एका महिलेनं धावत्या बसमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना घडली आहे. उडी मारताच महिलेचं डोकं बसच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला. खुलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नडहून छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या एमएच १४ बी टी ३०३८ क्रमांकाच्या बसमध्ये हा प्रकार घडला. गल्लेबोरगाव येथे महिलेनं बस थांबवली आणि चढून एका सीटवर बसली. बस पुन्हा मार्गस्थ झाल्यानंतर काही वेळातच महिलेनं अचानक धावत्या बसमधून उडी मारली. यात तिचं डोकं चाकाखाली येऊन चेंदामेंदा झालं आणि तिचा मृत्यू झाला.
बसमधील इतर प्रवाशांनी सांगितले की, महिला मानसिक तणावात दिसत होती. मात्र, तिनं उडी का घेतली याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. घटनेनंतर बसमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू केला आहे.



