Shirur News : सरकारी दवाखान्यात जाण्याचे सांगून घराबाहेर पडली; चार वर्षांच्या मुलासह महिला बेपत्ता
Shirur News : महिला व मुलाचा शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून दोघांना पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.

शिरूर : शिरूर तालुक्यातील रामलिंग, देवाडेवस्ती येथून एका विवाहित महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परत न आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सागर मुरलीधर धुळे (वय ३९, व्यवसाय मजुरी, रा. रामलिंग, देवाडेवस्ती, ता. शिरूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, पत्नी अनिता सागर धुळे (वय २९) ही ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता त्यांचा चार वर्षांचा मुलगा भिमा सागर धुळे याला सोबत घेऊन, “सरकारी दवाखाना, शिरूर येथे जात आहे,” असे सांगून घरातून निघून गेली. मात्र त्यानंतर ती मुलासह घरी परतली नाही.
महिला व मुलाचा शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून दोघांना पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचे वर्णन
अनिता सागर धुळे वय २९ वर्षे असून रंग सावळा, चेहरा गोल, केस लांब व काळे, नाक सरळ, अंगाने मध्यम व उंची अंदाजे ५ फूट १ इंच आहे. कानात लाल रंगाची फुले, गळ्यात मणी मंगळसूत्र व देवाचा ताईत आहे. अंगात पिवळ्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाउज असून पायात लाल रंगाच्या सँडल आहेत. त्या मराठी भाषा बोलतात. त्यांच्याकडे टेक्नो कंपनीचा मोबाईल असून त्यामध्ये ९०२२८३७०१३ क्रमांकाचे सिमकार्ड आहे.
मुलाचे वर्णन
भिमा सागर धुळे, वय ४ वर्षे, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे असून उंची अंदाजे २ फूट ५ इंच आहे. त्याच्या अंगात जांभळ्या रंगाचा फुल शर्ट व जांभळ्या रंगाची जीन्स आहे.
दरम्यान, महिला व मुलाचा शोध घेण्यासाठी शिरूर पोलिसांनी तपास पथकाच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू केली असून, त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय असलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार आगलावे हे करीत आहेत.





