जळगाव – आरोग्य यंत्रणेच्या अभावामुळे एका आदिवासी महिलेने भररस्त्यात लुगड्याच्या आडोशाला एका बाळाला जन्म दिल्याची हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत अजून किती दिवस महिलांची प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातींच्या मागे अशी हेळसांड होणार? असा जळजळीत प्रश्न उपस्थित केला आहे. जग चंद्रावर पोहोचले, पण आपल्याला आजही देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा पोहोचवता आल्या नाहीत. सरकारने सर्वांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या कितीही वाफा सोडल्या तरी, एखादी घटना घडते आणि समाजातील कटू वास्तव पुन्हा एकदा आपल्यापुडे तोंड आ करून पुढे राहते. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील बोरमळी गावातील एका आदिवासी पाड्यावरील महिलेवर आरोग्य सुविधांअभावी थेट रस्त्यावर प्रसूत होण्याची वेळ आली.