Madilage Robbery : कोल्हापुरात धाडसी दरोडा…! दराेडेखाेरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू, जुळी मुले बचावली; पहाटे नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आजरा तालुक्यातील मडिलगे गावात अज्ञात चार चोरट्यांनी दरोडा घातला. यामध्ये सुमारे १४ तोळे सोने व रोख रक्कम ९० हजार रुपये लंपास केले. धक्कादायक बाब म्हणजे दरोड्यात एका महिलेवर हल्ला करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे.
पूजा सुशांत गुरव (वय-३२) असं खून केलेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती सुशांत जखमी झाले आहेत. या हल्ल्यात दीड वर्षाची दोन जुळी मुले बचावली आहेत. ही घटना शनिवारी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान आजरा तालुक्यातील मडिलगे गावात गुरव गल्लीतील भरवस्तीत घडली आहे. या घटनेने परिसरात निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी सुशांत हे ग्रामपंचायत सदस्य असून ते कीर्तनकार व आचारीही आहेत. रात्री अडीच वाजता सुशांत घरामागील बाथरूमसाठी गेले होते. त्यामुळे घराच्या मागील दरवाजे उघडे होते. याचा फायदा घेत अज्ञात ४ चोरट्यांनी घरात प्रवेश केला व मागील दरवाजा लावला.
मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे सुशांत यांनी पूजा यांना आवाज दिला. आणि दरवाजाला जोराने धक्का दिल्यामुळे दरवाजा उघडला. अज्ञात चोरट्यांपैकी एकाने सुशांत यांना धरत मारहाण केली. खोलीच्या आतील बाजूस पूजा यांच्याकडील सोने व रक्कम हिसकावताना झटापट झाली.
यावेळी त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. यानंतर अंगावरील दागिने व रोख रकमेची बॅग घेऊन मागील दाराने चोरटे पसार झाले. रक्तबंबाळ झालेल्या पूजा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर हे दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.





