काँग्रेसच्या महिला नेत्याने भगवान परशुरामांची तुलना केली औरंगजेबाशी, पक्षाने नोटीस बजावल्यानंतर मागितली माफी

जबलपूर – मध्य प्रदेशातील जबलपूरच्या महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा रेखा जैन यांनी भगवान परशुरामांची तुलना औरंगजेबाशी केली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली असून ब्राह्मण समाजाने याचा निषेध केला आहे. हा एक अक्षम्य गुन्हा असल्याची टीका राज्य सरकारमधील मंत्री विश्वास सारंग यांनी केली आहे. या प्रकरणाचा व्यापक निषेध सुरू झाल्यानंतर अखेर काँग्रेसने रेखा जैन यांना नोटीस बजावली.
परशुराम हे देवाचे अवतार आहेत आणि त्यांची औरंगजेबाशी तुलना करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. काँग्रेसने अशा नेत्याला पक्षातून काढून टाकावे. अन्यथा, ही त्यांची विचारसरणी आहे हे सिद्ध होईल असे विश्वास सारंग यांनी म्हटले आहे.
जबलपूर शहर काँग्रेसने रेखा जैन यांना नोटीस बजावली आणि ४८ तासांच्या आत माफी मागण्याचे निर्देश दिले. ब्राह्मण समाजाचा निषेध आणि काँग्रेसकडून नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या रेखा जैन याही थोड्या नरमल्या असून त्यांनी माध्यमांसमोर येऊन माफी मागितली. जबलपूर काँग्रेसचे म्हणणे आहे की रेखा जैन यांच्या कृत्यामुळे काँग्रेसची धर्मनिरपेक्ष प्रतिमा मलिन झाली आहे.
रेखा जैन यांनी फेसबुक पोस्टद्वारे भगवान परशुरामांवर भाष्य केले होते. त्यांनी कथाकार मनिका मोहिनी यांची फेसबुक पोस्ट शेअर केली होती. फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की औरंगजेबाने आपल्या भावाचा शिरच्छेद केला आणि त्याचे शिर त्याच्या वडिलांना अर्पण केले तर भगवान परशुरामांनी आपल्या आईचा शिरच्छेद केला आणि तिचे शिर अर्पण केले.
पोस्टमध्ये लिहिले होते की, कोणताही मुस्लिम औरंगजेबाला आदर्श मानत नाही आणि कोणीही त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवत नाही. परंतु हिंदुत्वाचे ठेकेदार परशुराम सारख्या पात्राला आदर्श मानतात आणि परशुरामाची मंदिरेही बांधतात.




