अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिलेस अटक

शिक्रापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या महिलेला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातून ताब्यात घेत अटक केली आहे.
कोंढापुरी ता. शिरूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड हे त्यांचे फेसबुक चेक करत असताना त्यांना त्यांच्या फेसबुक वर संगीताताई वानखेडे हि महिला फेसबुक लाईव्ह येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे आणि शिवीगाळ केल्याचे दिसून आले.
त्यांनतर माजी सरपंच तसेच स्वप्नील गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत माजी सरपंच आणि स्वप्नील अरुण गायकवाड वय ३२ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी संगीताताई वानखेडे रा. चाकण ता. खेड जि. पुणे या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मात्र सदर महिलेवर गुन्हा दाखल केल्यानंतर महिलेला अटक करण्यापूर्वीच सदर महिलेला बुलढाणा पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले. त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई किशोर शिवणकर, महिला पोलीस स्नेहल गायकवाड, सिमा बोचरे यांनी येथील न्यायालयातून सदर महिलेच्या अटकेबाबत कागदपत्राची पूर्तता करून बुलढाणा गाठले.
त्यांनतर तेथील न्यायालयात महिलेबाबत गुन्ह्यांची सर्व माहिती देत न्यायालयाच्या आदेशाने शिक्रापूर पोलिसांनी संगीताताई वानखेडे या महिलेला ताब्यात घेत अटक केली. तर आज या महिलेला शिरूर न्यायालयात हजर करण्यात येणार असून न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस नाईक विलास आंबेकर हे करत आहे.





