“मोदींच्या नेतृत्वाखेरीज भाजप 150 जागाही जिंकणार नाही, पक्ष दुर्बळ होईल” – निशिकांत दुबे

नवी दिल्ली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय भारतीय जनता पक्ष १५० जागाही जिंकू शकणार नाही,” असा ठाम दावा झारखंडमधील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. ते ANI च्या पॉडकास्टमध्ये बोलत होते.
दुबे म्हणाले, “पुढील १५-२० वर्षे मला फक्त मोदीजीच दिसतात. हे मी केवळ त्यांचं पंतप्रधान पद पाहून म्हणत नाही. त्यांच्या नेतृत्वात गरीबांचं, सर्वसामान्यांचं समर्थन भाजपकडे वळलं आहे. हे समर्थन पूर्वी कधीच पक्षाकडे नव्हतं.”
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना दुबे म्हणाले, “मी २००९ साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि अवघ्या ६ हजार मतांनी निवडून आलो. माझ्या मागे लागोपाठ तीन उमेदवारांना अनुक्रमे १.८४ लाख, १.७२ लाख आणि ८० हजार मते मिळाली होती. म्हणजे मी एका प्रचंड अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला होता. पण नरेंद्र मोदी आले आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली.”
#WATCH | BJP MP Nishikant Dubey says, “…For the next 15-20 years, I see PM Modi only. And it is not only because he is the Prime Minister…When PM Modi came, the vote bank, which was never the BJP’s vote bank, especially the poor section of society, became the vote bank of… pic.twitter.com/f9j8KpJKI6
— ANI (@ANI) July 18, 2025
त्यांनी सांगितलं की, “मोदीजींच्या नेतृत्वात गरीब, ग्रामीण आणि मागासवर्गीय मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली नाही, उलट त्यांच्यावर विश्वास ठेवला. यामुळे पक्षाला नवे मतदार मिळाले. ज्यांना हे पटत नसेल, त्यांनी वास्तवाकडे डोळसपणे पाहावं.”
दुबे पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदीजी जर उद्या निवृत्त झाले, तर भाजपला पुन्हा १५० जागाही मिळणार नाहीत. त्यामुळे २०२९ ची निवडणूकही मोदीजींच्याच नेतृत्वात लढावी लागेल. भाजपची ही गरज आहे.”
मोदीजींविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “मोदीजींना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज नाही, उलट आम्हाला त्यांची गरज आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाशिवाय पक्षाचं भवितव्य अधांतरी आहे. ते जर २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवू इच्छित असतील, तर त्यांनी तोपर्यंत नेतृत्व द्यावं.”
पंतप्रधान पदासाठी वयोमर्यादा असावी का, यावरून अलीकडेच संघप्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केलं होतं. त्यावर अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देताना दुबे म्हणाले, “मोरारजी देसाई ८२ वर्षांचे असताना पंतप्रधान होते. मग मोदीजींनी ७५ व्या वर्षानंतर निवृत्त व्हावं, हा आग्रह योग्य नाही.”
उत्तर प्रदेशचा दाखला देताना दुबे म्हणाले, “२०१७ साली उत्तर प्रदेशात आमच्याकडे कोणताही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हता. तरीही मोदीजींच्या नावावरच भाजपला घवघवीत यश मिळालं. आजही आम्हाला मोदीजींच्या नावावरच मते मिळतात.”
दुबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकारीवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र दुबे यांनी या चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केलं की, “आजही मोदीजीच आमचे सर्वस्व आहेत आणि पुढील काळातही त्यांच्याच नेतृत्वाची गरज आहे.”





