अश्विनचे ODI क्रिकेटच्या भवितव्याबाबत मोठं विधान; “एकदा तर मीच कंटाळून सामना सुरू असताना टीव्ही…”

लंडन – जागतिक क्रिकेटमध्ये सध्या टी-20 क्रिकेटचा इतका अतिरेक झाला आहे की, येत्या काळात एकदिवसीय क्रिकेटलाच धोका निर्माण झाला आहे, असे मत भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने व्यक्त केले आहे.
टी-20 क्रिकेटची इतकी सवय झाली आहे की, एकदा तर मीच कंटाळून एकदिवसीय सामना सुरू असताना टीव्ही बंद केला होता. आता क्रिकेट चाहते देखील टी-20 क्रिकेटकडे जास्त आकर्षित होत आहेत. याचबरोबर कसोटी क्रिकेटचेही पुनरुज्जीवन सुरू झाले आहे. विशेष करून इंग्लंडने चार कसोटी सामने जिंकल्यापासून त्यातील चाहत्यांचा रस वाढत आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटचे भवितव्य अधांतरी होत आहे. कदाचित त्यामुळेच टी-20 लीग खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली असावी, असेही तो म्हणाला.
पूर्वी टी-20 क्रिकेट जोपर्यंत सुरू झाले नव्हते तेव्हा एकदिवसीय सामनेच जास्त लोकप्रिय होत होते. चाहतेही वेळात वेळ काढून अखेरच्या चेंडूपर्यंत सामना पाहायचे. आता तेच चाहते टी-20 सामने जास्त पाहात आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजांना थेडीतरी संधी असायची. मात्र, टी-20 क्रिकेटने ही संधीही हिरावून घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्येही गोलंदाजांसाठी संधी ठेवली जावी, असेही त्याने म्हटले आहे.
स्वीचहिटलाही पायचितचा नियम हवा
टी-20 क्रिकेटमध्ये तसे पाहायला गेले तर गोलंदाजांसाठी फार वाव नसतो. फलंदाजही अनेकदा पुस्तकी फटका खेळण्याच्या जागी स्विचहिटसारखे नवे फटके खेळतात. मात्र, हा फटका खेळताना पंच पायचितचे अपील ग्राह्य धरत नाहीत. मात्र, आता स्विचहिट अनेक फलंदाज मारतात व त्यावेळी ते विरुद्ध दिशेने फलंदाजी करतात मग त्यांनाही पायचितचा नियम लावला गेला पाहिजे, हा गोलंदाजांचा हक्क नव्हे का, असा सावलही अश्विने केला आहे.





