IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर 6 विकेट्स राखून दमदार विजय

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताने शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर बांगलादेशवर 6 विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. गिलने 125 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारताच्या या विजयात मोहम्मद शमी आणि शुभमन गिलचे मोलाचे योगदान राहिले. बांगलादेशने टीम इंडियाला २२९ धावांचे आव्हान दिले होते.
या लक्ष्य भारतीय संघाने ४६.३ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. या सामन्यात शुभमन गिलने शतक ठोकले. तसेच शमीने ५ विकेट्स घेतल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल यांनी आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी झटपट अर्धशतकी भागीदारी केली होती. पण अखेर १० व्या षटकात त्यांची जोडी तस्किन अहमदने तोडली. त्याने रोहित शर्माला रिशाद हुसैनच्या हातून झेलबाद केले. रोहितने ३६ चेंडूत ४१ धावा केल्या.
यानंतर विराट, श्रेयस आणि अक्षर पटेल ठराविक अंतराने बाद झाले. मात्र गिल दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत होता. यानंतर के एल राहुल यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. शुभमन गिल १२९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावांवर नाबाद राहिला, तर केएल राहुलने ४७ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी केली.
त्याअगोदर बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने सौम्य सरकारला शुन्य धावांवर यष्टीरक्षक केएल राहुलकडून झेलबाद केले.त्यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणाने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला शुन्य धावांवर विराट कोहलीच्या हातात कॅच देऊन झेलबाद केले. शांतो बाद झाला तेव्हा धावसंख्या 2 बाद 27 धावा होती. यानंतर अक्षर पटेल आणि शमीने भेदक गोलंदाजी करत बांगलादेशची अवस्था ३५ वर ५ विकेट अशी झाली होती.
यानंतर सहाव्या विकेटसाठी तोहिद हृदोय आणि जाकेर अली यांनी १५४ धावांची भागीदारी केली संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. बांगलादेशने ४९. ४ ओव्हरमध्ये २२८ धावा केल्या. हृदोयने ११८ चेंडूत १०० धावा केल्या. जाकर अलीने ६८ धावांची खेळी केली. या दोघांशिवाय सलामीवीर तान्झिद हसनने २५ धावा आणि रिशाद हुसैनने १८ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून फक्त या चौघांना दुहेरी धावसंख्या गाठता आली होती.





