Dry Fruits: थंडीच्या चाहुलीसोबतच सुक्या मेव्याचे दर कडाडले! बदाम, पिस्ता आणि खजूर महागले
दरवाढीमुळे ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण घटले

पिंपरी – थंडीच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुक्या मेव्याला पसंती दिली जाते. मात्र, यंदा सुक्या मेव्याच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. बदाम, पिस्ता आणि खजुराच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही पदार्थांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वी किलोभर सुका मेवा खरेदी करणारे ग्राहक आता पाव किलो किंवा अर्धा किलोवर समाधान मानत आहेत.
हिवाळ्यात सुक्या मेव्याला विशेष मागणी असते. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, खजूर, अंजीर आणि मनुका यांचा आहारात वापर वाढतो. दूध, शिरा, लाडू आणि विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठीही सुका मेवा वापरला जातो. त्यामुळे नोव्हेंबरपासून बाजारपेठेत या पदार्थांची मागणी वाढू लागते.
पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आणि आकुर्डी परिसरातील किराणा दुकाने तसेच सुक्या मेव्याच्या विक्री केंद्रांमध्ये ग्राहकांची ये-जा सुरू आहे. मात्र, वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक खरेदी करताना दरांची तुलना करत आहेत. गरजेपुरतीच खरेदी करण्याकडे त्यांचा कल दिसत आहे.
बदाम, पिस्त्याच्या दरात मोठी वाढ
गतवर्षी ८०० रुपये किलो असलेले बदाम यंदा ११०० रुपयांवर पोहोचले आहेत. पिस्त्याचे दर तर दुप्पट झाले आहेत. गतवर्षी ९०० रुपये किलो असलेला पिस्ता आता १८०० रुपये किलोने विकला जात आहे. खजुराच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
गतवर्षी २५० रुपये किलो असलेला खजूर यंदा ५०० रुपये किलो झाला आहे. काजूच्या दरात तुलनेने कमी वाढ झाली आहे. अक्रोडचे दर मात्र गतवर्षीच्या तुलनेत स्थिर असल्याचे दिसून येते. विविध दर्जा आणि गुणवत्तेनुसार दुकानांमध्ये दरांमध्ये फरक असू शकतो.
आयात खर्च आणि वाहतूक महागली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उताराचा परिणाम सुक्या मेव्याच्या दरांवर होत आहे. आयात खर्चात झालेली वाढ, वाहतूक खर्च आणि पुरवठ्यातील बदल यामुळे विक्री दर वाढले आहेत. याचा फटका व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही बसत आहे.
थंडीचा जोर वाढल्यानंतर सुक्या मेव्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, दरवाढ कायम राहिल्यास खरेदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
महागाईमुळे ग्राहकांचे नियोजन बदलले
सुक्या मेव्याचे दर वाढल्याने नागरिकांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे. काही ग्राहक केवळ आवश्यक पदार्थांचीच खरेदी करत आहेत. तर काही जण स्वस्त पर्यायांचा विचार करीत आहेत. आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या सुक्या मेव्याची खरेदी आता सर्वसामान्यांच्या बजेटवर अवलंबून राहिली आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात सुक्या मेव्याचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सुक्या मेव्याचे तुलनात्मक दर
प्रति किलो दर (रुपयांत)
सुका मेवा गतवर्षी यंदा
बदाम ८०० १,१००
पिस्ता ९०० १,८००
खजूर २५० ५००
काजू ८५० ते १,००० ९०० ते १,२००
अक्रोड १,१०० ते १,४०० १,१०० ते १,४००





