जोडून आलेल्या सुट्ट्यांनी सातारकरांना भ्रमंतीचे वेध

सातारा – यावेळचा वीकएंड आणि पुढील आठवड्यातील दोन सलग सुट्टया यामुळे सध्या अनेक जण पर्यटनाच्या मूडमध्ये आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना सोमवारची (दि. 14) रजा टाकावी लागणार आहे. ही सुट्टी मिळाल्यास सलग पाच दिवस सुट्टीचा आनंद सातारकरांना मिळणार असून लांब प्रवासाचे बेत आखले जाऊ लागले आहेत.
सध्या सुरू असलेल्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि 16 ऑगस्टला पतेती या दोन सार्वजनिक सुट्ट्या असल्या तरी शासकीय कार्यालये, बॅंका ऑगस्ट महिन्यात 8 दिवस बंद राहणार आहेत. यातही 12 ऑगस्टचा दुसरा शनिवार आणि 13 ऑगस्टचा रविवार, यानंतर 14 ऑगस्टच्या सोमवारची एक रजा टाकल्यास सलग 5 दिवस सुटी मिळणार असल्याने अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. यामुळे शहरालगतचे रिसॉर्ट, व्हिलाज् यांच्या बुकिंगमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. तर गोव्याकरिताची विमान तिकिटे 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.
महाराष्ट्रात बॅंकांना व शासकीय कार्यालयांना 12 ऑगस्टचा दुसरा शनिवार आणि लागून 13 ऑगस्टचा रविवार, 19 ऑगस्टचा चौथा शनिवार आणि लागून 20 ऑगस्टचा रविवार याशिवाय 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 16 ऑगस्ट पतेती तसेच 6 आणि 27 ऑगस्टचे रविवार अशा आठ सुट्ट्या आहेत. मात्र, 12 ऑगस्टचा दुसरा शनिवार, 13 ऑगस्टचा रविवार आणि 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टची सार्वजनिक सुटी यांच्यामध्ये केवळ सोमवार 14 ऑगस्टची रजा टाकून सलग पाच सुट्ट्या एन्जॉय करण्याचे प्लॅन अनेकांनी बनविले आहेत. साताऱ्यात सध्या पावसाने उघडीप घेतली आहे. महाबळेश्वर, पाचगणीसह कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे निसर्गाने बहरली आहेत. पाच दिवसाचा वीकएंड साजरा करण्यासाठी सातारकर बाहेर पडणार हे निश्चित. कोकण, कोल्हापूर, चांदोली अभयारण्य, आंबोलीकडे जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सकडे चौकशी सरु झाली आहे. त्याची बुकिंग सुध्दा फुल झाली आहेत. ट्रॅव्हल्सवाल्यांनी या वीकएंडचे प्रवास शुल्क बाराशे रुपयापर्यंत वाढविले आहेत.





