“अशा किरकोळ आंदोलनाने..” ; मनसेच्या सभा उधळण्याचा इशाऱ्यावर अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्यामुळे देशभरात एकच वाद पेटला आहे. दरम्यान राहुल गांधींच्या विधानानंतर मनसेने राहुल गांधींची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. मनसेच्या याच इशाऱ्यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना मनसेच्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी म्हणाले “लोकांचा इतका पाठिंबा आहे की, अशा किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”.
दरम्यान, “महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावला पोहोचतील. सावकरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणार आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करु,” असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
“काँग्रेसने वल्गना करण्याची गरज नाही. काँग्रेसची काय ताकद आहे हे आम्हाला माहित आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा इतिहास त्यांना माहिती नाही,” असेही ते म्हणाले आहेत. त्यांना धडा शिकवण्याची गरज असून आम्ही तो शिकवणार आहोत असे यावेळी त्यांनी सांगितले.





