जड अंतःकरणाने ‘या’ नेत्यांनी वाहिली जेटलींना श्रद्धांजली

नवी दिल्ली – देशाचे माजी केंद्रीय मंत्री ‘अरूण जेटली’ यांचे निधन झाले आहे. त्यांनी 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे.

अरूण जेटलींच्या निधनाने पक्षातील मैत्री जपणाऱ्या एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे. विरोधी पक्षनेता म्हणून राज्यसभेत कोणत्याही विषयावर सरकारला धारेवर धरताना त्यांच्यातील प्रवाही संवादकौशल्याने सत्ताधारीही प्रभावित होते. केंद्रिय अर्थमंत्री पदावर नियुक्‍ती झाल्यानंतर त्यांच्यातील प्रखर बुद्धीमत्तेची प्रचिती संपूर्ण राष्ट्राला आली. नोटाबंदीसारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक विषयावर अथवा जीएसटीसारख्या जटील विषयावर जेटलींनी सरकारची बाजू समर्थपणे मांडली. जीएसटी करप्रणालीत काही सुधारणा सुचविल्यानंतर त्यांचे स्वागतही केले. एलजीबीटीसारख्या संवेदनशील विषयावर देखील ते आपली मते निर्भिडपणे व्यक्‍त करत होते.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्त्व आपण गमावले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील. देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधि व न्याय विभागाचे मंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पेशाने वकिल असलेले अरूण जेटली हे अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे विरोधक ही त्यांच्या प्रेमात पडत असत. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीमुळे जीएसटीचे सर्व निर्णय पक्षीय भेद न राहता ना केवळ एकमताने तर ते एक दिलाने मंजूर झाले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळेच देशात या करप्रणालीची अंमलबजावणी यशस्वी ठरली. देशपातळीवर सर्वसमावेशक विचार करणारं, मनमिळावू, मुत्सदी असे ज्येष्ठ नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. ही राष्ट्राची मोठी हानी आहे. एक मोठा आधारवड आज हरवला आहे.
– सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

यशस्वी वकील असलेल्या अरुण जेटली यांनी सक्रिय राजकारणातही चांगले योगदान दिले. खासदार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, अर्थमंत्री आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी भूषवल्या. सखोल अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. स्वपक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद होता. जेटली कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
– आमदार बाळासाहेब थोरात, कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे भारताने अर्थशास्त्रात पारंगत असलेले विद्वान नेतृत्व गमावले आहे. लोकप्रिय अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशवासीयांच्या मनात आपल्या कामाचा अमिट ठसा उमटविला आहे. त्यांना आंबेडकरी चळवळीबद्दल आपुलकी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप आदर होता. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे.
– रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट, वाणिज्य, उद्योगांसह इतर अनेक मंत्रालयांचा कारभार सांभाळताना जेटली यांनी आपल्या कामकाजाचे मापदंड निर्माण केले. त्यांनी जनसामान्यांच्या हितासाठी पथदर्शी निर्णय घेताना उद्योग व व्यवसाय यांच्या वाढीसाठी देखील पूरक निर्णय घेतले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा आपल्याला बहुमान मिळाला.
– सी. विद्यासागर राव, राज्यपाल

जेटली राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते. तसेच ते निष्णात विधिज्ञ होते. संसदेतील त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असायची. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील अभ्यासू व उत्कृष्ट संसदपटू हरपला आहे. जेटली मागील काही महिन्यांपासून आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
– विजय वडेट्टीवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

अरुण जेटली यांच्या निधनामुळे देशाला धक्का बसला असून शिवसेनेचीही वैयक्तिक हानी झाली आहे. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा खांब कोसळला आहे. “संकटमोचक’ म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजपमध्ये नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी जेटली होते. आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते होतो. त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे.
– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

विद्वान आणि कर्तबगार नेता गमावला – चंद्रकांत पाटील
अरुण जेटली विद्वान कायदेतज्ज्ञ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अर्थ आणि संरक्षण खात्यांची जबाबदारी सांभाळताना अरुण जेटली यांची कर्तबगारी दिसली. देशात जीएसटी लागू करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली. जेटली यांचे भाजपच्या धोरण निश्‍चितमध्ये मोलाचे योगदान होते. पक्षाची भूमिका मांडणारे ठराव तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने भाजपाने महत्त्वाचे विचारधन गमावले आहे.
– चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

बदलता भारत घडवताना जेटलीजी हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहयोगी होते. अशा समर्थ नेत्याचे निधन म्हणजे हे संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. देशाचे महान नेते अरुण जेटली यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने देशाने एक विद्वान, एक प्रगल्भ कायदेपंडित आणि कर्तुत्ववान नेता गमावला. जेटली यांनी भारताला उच्च स्थानावर पोहचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जेटली यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप वेदनादायक आहे. कारण ते माझे मार्गदर्शक आहेत.
– मंगल प्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे अरूण जेटली यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस मनसेचे विनम्र अभिवादन.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×