श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जटोली शिव मंदिरात विराजमान; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Ganeshotsav 2024 | लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात बाप्पांची मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं जात आहे. पुण्यातील मानाच्या आणि महत्त्वाच्या गणपतींची ख्याती जगभर आहे, त्यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी केवळ राज्यातून नव्हे तर राज्याच्या बाहेरून अगदी परदेशातूनही अनेक भाविक, पर्यटक पुण्यात येतात.
पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन झाले आहे. लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी पुणेकर उत्सुकता झाले आहेत.
सिंह रथामधून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली आहे. सिंह रथाला फुलांची सुंदर आरास केली आहे. त्यानंतर जटोली शिव मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान झाले आहे. दुपारी 12:15 वाजता दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली.
दगडूशेठ गणपतीच्या स्वागतासाठी विविध ढोल-पथकांनी वादन झाले. दगडूशेठ मंदिराच्या परिसर ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.





