NCP : राष्ट्रवादीत विसंवादाचे वारे? सुनेत्रा पवार, पार्थ यांना न सांगताच पटेल आणि तटकरेंनी…; धक्कादायक माहिती समोर
NCP : या भेटीत तटकरे पटेल आणि मुख्यमंत्र्यांची नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विसंवादाचे वारे वाहू लागले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नुकतीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत तटकरे पटेल आणि मुख्यमंत्र्यांची नेमकी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या सगळ्यात महत्वाची घडामोड घडली म्हणजे याचवेळी वर्षावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील दाखल झाले होते. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यानंतर तर्क वितर्कांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली याबाबत सांगितले असून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती चक्क पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना नव्हती. काल पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बुधवारी दुपारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री अनिल पाटील तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना काही मुद्द्यांवर थेट जाब विचारला. विशेषतः मंगळवारी रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील यांनी काय सांगितलं?
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्याचवेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील देखील तेथे उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या भेटीनंतर बुधवारी दिवसभर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या, तसेच शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना जोर आला.
मात्र, या सर्व चर्चांना जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पूर्णविराम दिला. “आम्ही एकाच वेळी ‘वर्षा’वर होतो, मात्र माझी सुनील तटकरे किंवा अनिल पाटील यांच्याशी कोणतीही भेट झाली नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना फेटाळून लावले.
Katrina Kaif Birthday: फ्लॉप डेब्यूपासून ब्लॉकबस्टर क्वीनपर्यंत; कतरिना कैफचा भन्नाट प्रवास




