Sunetra Pawar : “महाराष्ट्राच्या विकासासाठी…”; अजित पवारांची जयंती साजरी करण्याच्या निर्णयावर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar : या निर्णयानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sunetra Pawar : महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे दिवंगत नेते सर्वांचे लाडके अजित पवार अर्थात ‘अजितदादा’ यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे.
त्यानुसार अजित पवारांच्या जयंतीचा कार्यक्रम २२ जुलै रोजी राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे. या निर्णयाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात आले असून आता या निर्णयानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दादांच्या कार्याचा राज्याने केलेला अधिकृत गौरव : सुनेत्रा पवार
“जयंतीचा सन २०२६ पासून राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा केवळ शासन निर्णय नसून, महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या दादांच्या कार्याचा राज्याने केलेला अधिकृत गौरव आहे.” अशी पहिली प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. त्यांनी याविषयी फेसबुक पोस्ट लिहित सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
पोस्टमध्ये सुनेत्रा यांनी पुढं म्हटलं आहे की,”दादांनी प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीने काम केले. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. म्हणूनच ते जनतेच्या मनात केवळ एक नेता नव्हते, तर प्रत्येकाच्या हक्काचे ‘दादा’ होते.”
यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. दादांच्या लोकसेवेचा, विकासदृष्टीचा आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे. आदरणीय अजितदादांचे विचार, कार्य आणि विकासाचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आदरणीय अजितदादांना विनम्र मानवंदना! असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
जयंती राज्यभर साजरी केली जाणार
दिवंगत अजित पवार यांचा राज्याच्या विकासात मोलाचा वाटा राहिलेला आहे. सामान्य जनमानसांत काम करणारा माणूस अशी प्रतिमा राहिलेली आहे. परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै, २०२६ रोजी अजित पवार यांची जयंती राज्यभर साजरी केली जाईल. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही अजित पवारांच्या जयंती साजरी करावी लागणार आहे.




