Wimbledon 2023 : चेक प्रजासत्ताकची वांद्रेसोव्हा ठरली विंम्बल्डनची ‘क्विन’

लंडन :- चेक प्रजासत्ताकची 24 वर्षीय मार्केटा वांद्रेसोव्हा “विम्बल्डन’च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ट्युनिशियाच्या ओन्स जेबुरचा सरळ सेटमध्ये पराभव करत “क्विन’ ठरली. या विजयासह तिने प्रथमच “ग्रॅंड स्लॅम’ विजेतेपद पटकावले.
वांद्रेसोव्हाने जेबुरचा 6-4, 6-4 असा सहज पराभव केला. अशा प्रकारे विम्बल्डन जिंकणारी वांद्रोसोवा चेक प्रजासत्ताकची तिसरी खेळाडू ठरली. 1998 मध्ये जना नोवोत्नाने तर तिच्यापाठोपाठ पेट्रा क्विटोवा हिने 2011 आणि 2014 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
वांद्रेसोव्हाने पहिला सेट 6-4 असा जिंकून सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सेटमध्ये, जेबुर एका वेळी 3-2 ने आघाडीवर होती, परंतु वांद्रेसोव्हाने पुनरागमन केले आणि सेटमध्ये 5-4 अशी आघाडी घेतली. यानंतर तिने जेबुरला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही आणि हा सेट 6-4 असा जिंकला.
जेबुरने दुसऱ्या सेटमध्येही चांगली सुरुवात केली, परंतु, कामगिरीत पुन्हा ती सातत्य दाखवू शकली नाही. याचा फायदा घेत वांद्रेसोव्हाने हा सेट 6-4 असा जिंकत विजेतेपदाचा मानही पटकाविला. विशेष म्हणजे, विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी वांद्रेसोवा ही पहिली महिला बिगरमानांकित खेळाडू आहे.





