Wimbledon 2026 : जपानच्या ओसाकाने वर्ल्ड नंबर १ सबालेन्काला नमवून रचला इतिहास; सिनरची सलग पाचव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक
Wimbledon 2026 : विम्बल्डन २०२६ स्पर्धेत रविवारी रात्री जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने सर्वात मोठा उलटफेर केला.

Wimbledon 2026 Jannik Sinner Naomi Osaka Aryna Sabalenka Quarter Finals :टेनिस जगतातील सर्वात मानाच्या विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) स्पर्धेत रविवारी रात्री सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जपानची स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका (Naomi Osaka) हिने महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्काचा (Aryna Sabalenka) पराभव करत खळबळ उडवून दिली.
ओसाकाने सबालेन्काला ६-२, ७-६(२) अशा सरळ सेट्समध्ये धूळ चारत पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिनरने (Jannik Sinner) जपानच्या शिंतारो मोचिझुकीचा पराभव करत सलग पाचव्यांदा अंतिम ८ मध्ये स्थान पक्के केले.
आई झाल्यानंतर कोर्टवर परतलेल्या ओसाकाचा धमाका –
A statement victory. 💥🎾
Naomi Osaka delivers a sensational straight-sets performance to upset World No. 1 Aryna Sabalenka, sealing her place in the quarter-finals at Wimbledon 2026.#Wimbledon 2026 | LIVE NOW on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/ZCFPvWBpXC
— Star Sports (@StarSportsIndia) July 5, 2026
सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केवळ १ तास २८ मिनिटांत नाओमी ओसाकाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. आपल्या दमदार सर्व्हिस आणि आक्रमक ग्राऊंड स्ट्रोक्सच्या जोरावर तिने सबालेन्काला सामन्यात लय पकडूच दिली नाही. तिने पहिला सेट ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्काने कडवी झुंज देत सामना टाय-ब्रेकरमध्ये नेला, पण तिथेही ओसाकाने ७-२ अशी बाजी मारत सामना खिशात घातला.
हा विजय ओसाकासाठी अत्यंत भावनिक आणि खास होता; कारण २०२६ या वर्षात सबालेन्काविरुद्धचे तिचे मागील तिन्ही सामने ती हरली होती. तसेच, २०१८ च्या यूएस ओपननंतर तिने पहिल्यांदाच सबालेन्काला पराभूत केले आहे. आई झाल्यानंतर कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या ओसाकाच्या या विजयाचे क्रीडा विश्वात कौतुक होत आहे.
यानिक सिनरला मोचिझुकीने दिली कडवी झुंज –
11 straight wins at The Championships.
Defending champion Jannik Sinner seals his place in the quarter-finals with a 6-3, 7-6(0), 6-3 win against Mochizuki on Centre Court 🇮🇹 #Wimbledon pic.twitter.com/BCTkJlLeFn
— Wimbledon (@Wimbledon) July 5, 2026
पुरुष एकेरीच्या सामन्यात यानिक सिनरने मोचिझुकीचा ६-३, ७-६(०), ६-३ असा पराभव केला. स्कोअरलाईन जरी सरळ दिसत असली तरी जपानच्या या पात्रता फेरीतील खेळाडूने सिनरला घाम गाळायला लावला. विशेषतः दुसऱ्या सेटमध्ये मोचिझुकीने मजबूत डिफेन्स करत सामना ४-४ असा बरोबरीत आणला होता. मात्र, टाय-ब्रेकरमध्ये सिनरने आपला दांडगा अनुभव पणाला लावत एकही पॉईंट न गमावता ७-० ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये सिनरने पूर्ण वर्चस्व राखत ६-३ ने विजय मिळवला.





