नवी दिल्ली : माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यास इच्छूक असल्याचे म्हटले आहे. त्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. इतर मागासवर्ग आणि अपंगत्व कोट्यातून पूजा खेडकर यांनी युपीएससची परीक्षा दिली होती. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यायला तयार आहे. आधी ते म्हणाले की मी नाव बदलेल. आता ते म्हणतात की माझे अपंगत्व संशयास्पद आहे. मी एम्समध्ये जाण्यास तयार आहे, असे पूजा खेडकरच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. दिल्ली कोर्टाने पूजाच्या १० दिवसांची कोठडी मागितली होती. पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्याकरता तथ्य लपवल्याचा आरोप दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात केला. परंतु, दिल्ली पोलिसांनी कोठडीत चौकशीची विनंती केली नसल्याचा प्रतिवाद पूजाच्या वकिलांनी केला. तसेच, आवश्यक नोंदी आधीच अधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी म्हटले.