रशियाविरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनचे सैन्य युक्रेनमध्ये पाठवले जाईल का?

मॅन्चेस्टर – युक्रेनमध्ये रशियाविरोधात लढण्यासाठी ब्रिटनच्या सैन्याला पाठवले जाणार नाही, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ( Rishi Sunak) यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रॅन्ट शॅप्स यांनी अलिकडेच “ब्रिटनकडून युक्रेनमध्ये सैन्य पाठवले जाऊ शकते.’ असे सूतोवाच केले होते. त्यावर सुनक यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.
शॅप्स यांनी युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी देखील तेथे ब्रिटनचे सैन्य पाठवले जाऊ शकेल, असे म्हटले होते. मात्र शॅप्स यांचे वक्तव्य माध्यमांकडून प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासातच सुनक यांनी ती शक्यता देखील फेटाळून लावली आहे.
अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ब्रिटन आणि अन्य मित्र देशांनी आतापर्यंत युक्रेनमध्ये कोणत्याही प्रकारे थेट लष्करी हस्तक्षेप करण्याबाबत भाष्य करणे टाळले आहे.
संरक्षण मंत्र्यांनी जी शक्यता वर्तवली आहे, ती कदाचित एखाद्या दिवशी भविष्याबाबतची एकशक्यता होती. तसा सध्या तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. असा निर्णय गाईघाईने घेतला जाऊ शकत नाही. त्यासाठी खूप पूर्वतयारी आवश्यक असते. त्यामुळे सध्या तरी त्याबाबत कोणतेही मत व्यक्त केले जाऊ शकणार नाही, असेही सुनक यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये आलेल्या ब्रिटनच्या प्रत्येक सैनिकाला रशियाकडून लक्ष्य केले जाईल, अशी गर्भित धमकी रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेडवेदेव यांनी दिली होती. ब्रिटनने गेल्या वर्षी युक्रेनच्या सुमारे 20 हजार सैनिकांना ब्रिटनमध्येच प्रशिक्षण दिले होते.





