Narayan Rane : उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार? नारायण राणेंचं मोठं विधान…

मुंबई : गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र येऊन भाजपसोबत पुन्हा महायुती स्थापन करणार अशा प्रकारची विधाने दोन्ही गटाचे नेते आणि भाजपाचे नेते करत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेत फूट पडल्यामुळे मनाला वेदना झाल्या, दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं विधान त्यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.
यावर आता भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना चांगले दिसत नाही. ते ज्या बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असून दिशाभूल करणाऱ्या असतात, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. काही दिवस ते गप्प होते, पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे संजय राऊतांना चांगले दिसत नसल्याने ते शब्द वापरतात. त्याला एक दिवशी चांगले बोलायला आम्ही शिकवू, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला.
तसेच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावर नारायण राणे यांनी स्पष्ट सांगितले. ते म्हणाले, माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत. येणाऱ्या पावसाच्या आत मुंबई-गोवा महामार्गाचे बहुतांश काम करण्याचे प्रॉमिस ठेकेदाराने केलेले आहे, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.





