Maharashtra Politics : धुळ्यात उद्धव ठाकरेंना बसणार धक्का? माजी आमदार करणार अजित पवार गटात प्रवेश

धुळे : विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर ठाकरेसेनेला गळती लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेा, भाजप आणि राष्ट्रवादीकडून सुरू आहेत. गेल्या काही दिवसात माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ठाकरेसेनेची साथ सोडून जाताना दिसत आहेत. अशातच धुळ्यात देखील त्यांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेसेनेचे माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पाटील हे 2004 ला शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुन्हा ते ठाकरेसेनेत परतले होते.
असे असले तरी त्यांना डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेसेनेकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. अखेर त्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळ्यात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.





