‘त्या’ आमदारांची होणार हकालपट्टी ? काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक

मुंबई – काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यामध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक जागा वाटपाचा संदर्भातील असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर पुन्हा काही निवडक नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली जाणार असल्याची माहिती आहे.
फुटलेल्या आमदारांवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्रातील जनता आमच्याबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल. विधानपरिषद निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे.
या गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील काहीजण आहेत, मुंबईतील काहीजण आहेत. आम्ही त्यांची नावे शोधून काढली आहेत. त्यांची नावे आत्ता उघड करता येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वांना माहिती मिळेल.याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहे. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे. आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत, त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.





