पुण्यात १० जूनला मोठी राजकीय घडामोड घडणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाकडे सगळ्यांचे लक्ष

Nationalist Congress Party Anniversary : राज्याच्या राजकारणात सध्या एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा तर दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा केली जात आहे. अशातच १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची देखील चर्चा आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापन दिन असल्याने या दिनाने औचित्य साधत एकत्र येणार अशीही एक चर्चा सुरू आहे. मात्र, याउलट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त जोरदार तयार करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मोठ्या थाटात यंदाचा वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे दिशा निवडणुकीच्या दृष्टीने दिशा काय असेल याची माहिती देणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांमधून कार्यकर्त्यांची मोठी फौज पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने देखील वर्धापन दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
एकप्रकारचं राजकीय शीतयुद्ध
दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोठी कंबर कसली आहे. नुकतीच यांसदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एकाच शहरात, काही अंतराने होणारे हे दोन कार्यक्रम म्हणजे एकप्रकारचं राजकीय शीतयुद्ध होणार असल्याचे बोलले जात आहे.





