हाके-मिटकरी वाद विकोपाला! अजित पवार यांच्यावर पुन्हा टीका, आता तर म्हणाले “मी त्यांना …”

Laxman Hake | Amol Mitkari | ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील वाद आता विकोपोला गेल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद होणार असल्याचे दिसत आहे.
थेट आव्हान
सुरुवात अमोल मिटकरीने केली आणि शेवट आम्ही करणार असे थेट आव्हानच हाकेंनी मिटकरींना दिले आहे. एका वाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले. भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले. उद्या सुप्रिया सुळे आणि त्यानंतर रोहित पवार यांनाही सोबत घेत आहेत, त्यांना बाहेर थांबू द्या ना. हे काय गौडबंगाल आहे, असा प्रश्नही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे.
मिटकरी काय म्हणाले होते?
हाके हा बारा छिद्राचा पाना आहे. तो कुठून-कुठे आला या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे. तू अजितदादांवर टीका करुन बापापर्यंत जातो, आम्हालाही मायबापापर्यंत जाता येते. पण आमचे ते संस्कार नाहीत. आम्ही तुझी जीभ हासडून हातात देऊ शकतो, असे ते म्हणाले होते. लक्ष्मण हाकेचा मालक दुसराच आहे, तो कोण आहे. त्याने तुकडा टाकल्यामुळे तो पवार कुटुंबावर भुंकत आहे. हे आमच्या लक्षात आले आहे, असे देखील मिटकरी म्हणाले होते.
लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली: हाकेंचा सवाल
माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी मदत केली. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार सारखी बारामती एॅग्रो नाही, असे हाके म्हणाले. तसेच लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली हा काय न्याय आहे असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. अमोल मिटकरी यांनी माझ्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा, अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. मी उद्या अमोल मिटकरी यांच्या गावात जाणार असल्याचे देखील हाके यावेळी बोलताना म्हणाले.





