पुणे | वडगावशेरीत परंपरा खंडीत होणार का?

पुणे, {डॉ. राजू गुरव} – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाचा एकच आमदार सलग दोनदा निवडून येत नाही. मतदार प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहरा निवडतात.
हा इतिहास यंदाही कायम राहणार, की मोडीत निघणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार विरुद्ध अजित पवार पक्षातच लढत होण्याचे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
वडगावशेरी या विधानसभा मतदार संघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर येथून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षांचे आमदार झाले. कायमस्वरुपी कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला हा मतदारसंघ राहिला नाही.
या मतदार संघात आमदार सलग दोनदा निवडून येत नाही. त्यामुळी जुना की नवीन चेहरा पुढे येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) या पक्षांमध्येच यंदा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. उमेदवारी जाहीर करण्याएवजी थेट “एबी फॉर्म’च सुनील टिंगरे यांना देण्यात आल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून माजी आमदार बापुसाहेब पठारे किंवा त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे.
भाजपनेही या मतदार संघावर दावा केला होता. माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मागील काही महिन्यांपासून प्रचारालाही सुरुवातही केलेली आहे. त्यामुळे जगदीश मुळीक नेमकी काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बापुसाहेब पठारे यांनी ३३ हजार ११६ एवढ्या मतधिक्याने शिवसेनेच्या अजय भोसले यांचा पराभव केला होता.
सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या जगदीश मुळीक यांनी तत्कालीन शिवसेनेचे सुनील टिंगरे यांचा ५ हजार ३२५ मताधिक्याने पराभव केला. सन २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा ४ हजार ९५६ एवढ्या मताधिक्याने पराभव केला होता.
मतदारसंघातील समस्या…
या मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागले. त्यातच वाहतूक कोंडी, अनधिकृतपणे बुजविलेले व सोयीनुसार वळविलेले नाले, सतत पूरस्थिती यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नावीन्यपूर्ण मोठे विकास प्रकल्पही उभारण्यात आलेले नाहीत.
आमदारकीसाठी राजकीय मंडळीनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून अन्य पक्षात प्रवेश केल्याचे प्रकारही नागरिकांना आवडलेले नाहीत. महाविकास आघाडी व महायुतीतील सर्वच पक्षाच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मरगळ झटकून जोमाने प्रचारही करावा लागणार आहे.
मतदार संघातील समाविष्ट भाग
हा मतदारसंघ झोपडपट्ट्या, मध्यवर्गीय, हायफाय अशा संमिश्र स्वरुपाने व्यापलेला आहे. शहरी व ग्रामीण भागाचा या मतदार संघास समावेश आहे.
या मतदार संघात म्हस्केवस्ती, कळस, गणेशनगर, कुसमाडेवस्ती, माळवाडी, विश्रांतवाडी, भीमनगर, टिंगरेनगर, विद्यानगर, धानोरी, मुंजाबावस्ती, गोकुळनगर,
भैरवनगर, आनंद पार्क, साठे वस्ती, लोहगाव, खेसे पार्क, खांदवेनगर, येरवडा, नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, शांतीनगर, प्रतीकनगर, फुलेनगर, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, राजीव गांधीनगर, माजी सैनिकनगर, विमाननगर, रामवाडी, कल्याणीनगर, नगररोड, चंदननगर, वडगावशेरी, खराडी, मुंढवा, मांजरी व वाघोलीच्या काही भागांचा समावेश आहे.
मतदारांची संख्या
पुरुष : २,५६,४२९
महिला : २,४०,५८५
तृतीयपंथी : १०२
एकूण : ४,९७,११६





