मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अखेर मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाच्या दहापदरीकरणाचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 16 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गाचे दहापदरीकरण झाल्यास मुंबई पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होण्यास मदत होणार आहे. मुंबई – पुणे दरम्यानचा ९४.५ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग २००२ पासून वाहतूक सेवेत दाखल झाला. या महामार्गामुळे मुंबई पुणे अंतर कमी झाले असून प्रवास अडीच तासात करणे शक्य होत आहे. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या या महामार्गावरून दररोज ६५ हजारांहून अधिक वाहने धावतात. तर भविष्यात ही संख्या आणखी वाढणार आहे. मागील काही वर्षांपासून या महामार्गावरील वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, अपघात वाढत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून प्रवास अतिजलद आणि सुरक्षित करण्यासह भविष्यातील वाढत्या वाहनांना सामावून घेण्यासाठी एमएसआरडीसीने सहापदरी महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला. मात्र काही महिन्यांपूर्वी एमएसआरडीसीने आठपदरीकरणाचा प्रस्ताव रद्द करून महामार्गाचे थेट दहापदरीकरण करण्याचे निश्चित केले. सहा नवीन बोगदे मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून होणारा विकास व भविष्यातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेऊन या महामार्गाचे दहापदरीकरण करणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करीत एमएसआरडीसीने दहापदरीकरणाचा प्रस्ताव तयार करुन प्रशासकिय मंजूरीसाठी पुढे पाठवला. दहापदरीकरणाकरीता १०० मीटर रुंदीची जागा एमएसआरडीसीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही. या दहापदरीकरणाच्या प्रकल्पात सहा बोगदे बांधण्यात येणार आहे. या बोगद्यांसाठी ८५ हेक्टर जागा संपादित करावी लागणार असून त्यासाठी २०० कोटी रुपये लागणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.