कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी या महापालिकेच्या निवडणुका महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्धार केला असला तरी दुसरीकडे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादीला बाजूला सारण्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी या दोन्ही महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीत भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महायुतीच्या मित्र पक्षांशी चर्चा करण्यासाठी सुकाणू समिती निश्चित केली. त्यांनी कोल्हापुरात शिंदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली आहे. तथापि, महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत सामावून घेतले जाणार याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. कोल्हापुरात झालेल्या शिंदेसेनेच्या मेळाव्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली होती. दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी राजेश क्षीरसागर यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार केला नसल्याचा जाहीरपणे आरोप केला होता. हा अनुभव जमेस धरता महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पासून चार हात लांब राहण्याची भूमिका या मेळाव्यात मांडली गेली. भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र पक्ष असल्याने या दोघांनीच एकत्र लढले पाहिजे. महायुतीत जागा वाटपात आधीच रस्सीखेच सुरू असताना त्यात राष्ट्रवादीला वाटा देण्याची मानसिकता शिवसेनेची दिसून आली नाही. या मेळाव्यात शिवसेनेकडून मांडली गेलेली भूमिका ही महायुतीत मिठाचा खडा टाकणारी ठरली. ‘एकला चलो रे’ इचलकरंजी महापालिकेमध्ये जागा वाटपात सुरुवातीपासूनच भाजपने वर्चस्व ठेवण्याचे ठरवलेले आहे. येथे भाजप कडून शिंदे सेनेला काही जागा सोडल्या जातील. परंतु शहरात जेमतेम ताकद असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बोळवण केली जाईल. भाजपच्या माजी आमदारांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन जागा देण्याची तयारी दर्शविल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर गडबडून जाण्याची वेळ आली होती. भाजपची आक्रमक भूमिका पाहून राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक जांभळे यांनी काही उमेदवारांची घोषणा केली आहे. अन्य काही प्रभागात इच्छुकांनी भेटीगाठी, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीची ही काहीशी ‘एकला चलो रे’ भूमिका इचलकरंजीत महायुतीच्या एकतेमध्ये विघ्न आणणारी ठरत आहे. तथापि राष्ट्रवादीचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेनंतरच कोल्हापुरात दोन्ही महापालिकांसाठी महायुतीतील राष्ट्रवादीचे स्थान आणि महायुती एकत्रितरित्या कशी सामोरे जाणार हे स्पष्ट होईल.