Abhijeet Dipke : भारतात येताच ‘कॅाकरोच जनता पार्टी’च्या संस्थापकाला अटक होणार? अभिजीत दिपके म्हणाले…
Abhijeet Dipke : असे असतानाही आपण भारतात येण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर समर्थकांनी विमानतळावर येऊन भेटावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Abhijeet Dipke : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके 6 जून रोजी अमेरिकेतून भारतात येणार आहेत. देशातील विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांविरोधात संविधानिक आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी ते भारतात येत असल्याचे एका व्हिडिओद्वारे त्यांनी जाहीर केले आहे.
महत्वाचे म्हणजे नीटसह इतर महत्त्वाच्या परीक्षांमधील गोंधळ आणि वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र, भारतात परतल्यानंतर आपल्याला अटक होण्याची शक्यता असल्याची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. असे असतानाही आपण भारतात येण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर समर्थकांनी विमानतळावर येऊन भेटावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा : Peddi: रिलीजपूर्वीच ‘पेड्डी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; अॅडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधींची कमाई
नेमकं काय म्हणाले अभिजीत दिपके?
“विमानतळावर उतरताच मला अटक होऊ शकते, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही मी भारतात येणार आहे. या निर्णयाचे परिणाम काय असतील, याची जाणीव असूनही मी मागे हटणार नाही,” असे दिपके म्हणाले. तसेच, अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिपकेंनी सांगितलं आंदोलन करण्याचं कारण
नीट पेपर लीक प्रकरण, सीबीएसई आणि इतर भरती व प्रवेश परीक्षांमधील कथित अनियमितता या मुद्द्यांवर हे आंदोलन केंद्रित असणार आहे. पेपरफुटीमुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला असून हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसल्याचे दिपके यांनी नमूद केले. सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी दीर्घकालीन लढा उभारणे हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनापासून रोखणार की…
दरम्यान, 6 जून रोजी भारतात आल्यानंतर अभिजीत दिपके यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यात येणार की आंदोलन करू दिलं जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळाची उपमा दिल्यानंतर तरुणांमध्ये मोठा उद्रेक झाला. त्यानंतर सोशल मीडियावर कॅाकरोच जनता पार्टी अस्तित्वात आली. ‘कॉकरोच जनता पार्टी’ला युवकांवर लक्ष केंद्रित करणारी एक सोशल मीडिया चळवळ म्हणून पाहिले जाते. स्थापनेपासूनच प्रचंड लोकप्रियता मिळवली असून अनेकांनी पाठिंबा दिला आहे.






