Ladki Bahin yojana | लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर आता उर्वरित डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रितरित्या मकरसंक्रातीच्या दिवशी दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दिले जाणारे ३ हजार रुपये निवडणुकीनंतरच वितरित करावे, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. याची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली असून काँग्रेसच्या तक्रारीवर विचार केला जाईल, असे आयोगानं म्हंटले आहे. काँग्रेसने पत्रात नेमकं काय म्हंटले? राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकत्रीत देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावीत करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामुहीक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहिण योजनेला आमचा विरोध नाही. मात्र डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच देण्याचे निर्देश आयोगाने शासनास द्यावे, अशी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. बावनकुळेंची काँग्रेसवर टीका या मागणीवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, “लाडक्या बहिणींविरोधातील काँग्रेसचा द्वेषाचा चेहरा उघड झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला पाहवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीपासूनच काँग्रेसकडून या योजनेला विरोध करण्यात येत आहे. याआधी काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने ही योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, असे त्यांनी नमूद केले. “बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, त्यांच्या संसाराला आधार मिळतो आहे. हे पाहून काँग्रेसचा द्वेष, मत्सर आणि आकस पुन्हा उफाळून आला आहे,” असा आरोप बावनकुळे यांनी केला. “संक्रांतीच्या पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र, हे पैसे देऊ नयेत म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि राज्यातील माता-भगिनी काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत,”असे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, सध्या तरी राज्य निवडणूक आयोगाने याबाबत विचार केला जाईल, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा: Pune District : आशिर्वाद पदयात्रेतून सूचनांतून संवाद ; रामभाऊ दाभाडे यांना नागरिकांचा पाठिंबा वाढल्याचा विश्वास