पुणे – नगर रस्त्यावरील “बीआरटी’ मार्ग काढण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली असली तरी भाजपच्या सहयोगीपक्षासह स्वयंसेवी संस्थानी ती कायम ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महापालिकेने नगर रस्ता बीआरटी मार्गाचे सर्वेक्षण गोखले इन्सिट्यूटच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. महापालिकेकडून अवघ्या सात ते आठ वर्षांपूर्वी संगमवाडी ते खराडी (आपलं घर) या मार्गावर बीआरटी सुरू करण्यात आली होती. यासाठी, कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. त्यानंतर या रस्त्यावर गेल्या चार वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. हा मार्ग येरवडा ते रामवाडीपर्यंत आहे. या रस्त्यावर मेट्रोचे खांब बीआरटी मार्गातच आल्याने बीआरटी बंदच आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मेट्रोचे बॅरीकेडींग असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हा मार्ग काढण्याची मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी वारंवार केली आहे. रिपाईचे माजी महापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी याला विरोध केला आहे. प्रवासी संघटनाही या निर्णयाच्या विरोधात आहे. त्यामुळे, महापालिकेची कोंडी झाल्याने या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.