पुणे जिल्हा | भाजप पदाधिकाऱ्यांचा निरूउत्साह भोवणार?

पारगाव, {त्रिभूज शेळके} – देशासह पूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये महायुतीमधील मरगळ खासदार सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडते की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांच्या उमेदवारांची संपर्क दौऱ्याची रणधुमाळी सुरू आहे.
त्यामध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दौंड मतदारसंघात संपर्क दौरा चालू आहे. परंतु अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती बोटावर मोजण्या इतकी तर काही ठिकाणी बिलकुल उपस्थिती नसणे ही महायुतीची मरगळ दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना जरा हलक्यात घेतलेले दिसत आहे. कारण अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी आम्हाला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. याचाच प्रत्यय पारगाव, यवत या ठिकाणी अनुभवयाला मिळाला. याशिवाय दौऱ्यानिमित्त जाहिरात सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात आली होती.
त्यावर विद्यमान आमदार राहुल कुल यांचा फोटो नसणे, मागील वेळेस उमेदवार व या मतदार संघाची पूर्णपणे माहिती असणाऱ्या भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांचाही कुठे फोटो अगर नामोल्लेख नसणे, हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांचे नाव सुद्धा संपर्क म्हणून नसणे, कदाचित या सर्व गोष्टी भाजपा च्या कार्यकर्त्यांना रुचलेल्या नसाव्यात, अशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरून वेळीच मरगळ दूर होणे गरजेचे आहे. अन्यथा हा फटका सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम्हाला काल झालेल्या संपर्क दौऱ्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. परंतु सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असून त्यांना मत म्हणजेच मोदी साहेबांना मत असणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचार व मतदान करणार आहोत. आम्हाला आमचे नेते आमदार राहुल कुल यांच्याकडून सक्त आदेश आहेत.- अतुल ताकवणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड.





