गाझामध्ये मदत रोखली तर इस्रायलविरुद्ध कठोर भूमिका घेऊ – फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन

पॅरिस – जर इस्रायलने गाझामध्ये होत असलेली मानवतावादी मदत रोखली तर फ्रान्स इस्रायलविरुद्ध आपली भूमिका कठोर करेल, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष सोडवण्यासाठी दोन-राज्य उपायासाठी फ्रान्स वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
मानवतावादी मदत नाकेबंदीमुळे रोखली जाते आहे. अशा परिस्थितीमुळे अस्थिरता वाढते आहे. म्हणूनच, जर येत्या काही तासांत आणि दिवसांत मानवतावादी परिस्थितीला अनुकूल असा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर आपल्याला आपली सामूहिक भूमिका कठोर करावी लागेल, असे मॅक्रॉ म्हणाले. फ्रान्स इस्रायली वसाहतींवर निर्बंध लागू करण्याचा विचार करू शकते असे मॅक्रॉ यांनी सिंगापूरमध्ये पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
इस्रायल आपल्या भूमिकेत बदल करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाखाली, इस्रायलने गेल्या आठवड्यात गाझावरील ११ आठवड्यांची मदत नाकेबंदी अंशतः संपवली, त्यामुळे गाझामध्ये मर्यादित प्रमाणात मदत पोहोचवता आली आहे. यासाठी इस्रायलने स्वतःची मदत प्रणाली राबवायला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात टीका झालेल्या प्रणाली अंतर्गत सध्या मदत पुरवठा सुरू आहे.





