त्रिभाषा सूत्रासाठी घेणार जनतेचा कौल; ठाकरे बंधुंचीही घेणार भेट, समितीच्या बैठकीनंतर नरेंद्र जाधवांची माहिती

Dr. Narendra Jadhav | राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सक्तीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. त्यानंतर शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत ही समिती कामकाज कशी करेल या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच त्रिभाषा संदर्भात वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचे की कोणत्या इयत्तेपासून करायचे, याबाबत समिती राज्यभरातील जनतेचा कौल ऑनलाइन पद्धतीसह विविध माध्यमांतून घेतला जाणार आहेत. मराठी भाषेसंदर्भात कार्य करणाऱ्या राज्यभरातील संस्थांसह पालक व शिक्षक संघटना, राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व वृत्तपत्रांच्या संपादक आदींना पत्र पाठवून त्यांची निवेदने व मते मागविली जाणार आहेत.
नागरिकांचा कौल घेणार
त्याचबरोबर समिती ८ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर या ८ शहरांमध्ये जाणार असून दिवसभर तेथील संस्था, संघटना व नागरिकांचा कौल घेणार आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत शासनाने दिली असून ती 5 डिसेंबरपर्यंत आहे. समितीचे संकेतस्थळ १५ दिवसांत विकसित करण्यात येणार असून त्यावर सर्वसामान्य जनतेसाठी बहुपर्यायी पद्धतीने प्रश्नावली देण्यात येईल.
राज्यात विविध ठिकाणी जाऊन जनमताचा कानोसा घेण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांसह संभाजीनगर (०८ ऑक्टोबर), नागपूर (१० ऑक्टोबर), कोल्हापूर (३० ऑक्टोबर), रत्नागिरी (३१ ऑक्टोबर), नाशिक (११ नोव्हेंबर), पुणे (१३ नोव्हेंबर), सोलापूर (२१ नोव्हेंबर) आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत भेट देणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
इतर राज्यात त्रिभाषा सूत्रांची कशी अंमलबजावणी कशी सुरू आहे, त्याचीही समिती माहिती घेणार आहे. राज्यातील दोन कोटी १२ लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा समितीचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे त्यांनी यावेळी नमूद केले. यादरम्यानत्रिभाषा सूत्रावर मतप्रदर्शन केलेल्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी जाधव यांच्याकडून घेण्यात येणार आहे.
हेही वाचा:





