सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणी वाढणार? दोघांनाही नोटीस बजावणार

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात महायुतीने विधान परिषदेत मांडलेला हक्कभंग प्रस्ताव विशेषाधिकार समितीने शुक्रवारी स्वीकारला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत संबंधिताना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यामुळे सुषमा अंधारे आणि कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचे परिषदेतील सदस्य प्रवीण दरेकर यांनी कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत व्यंगात्मक कविता केली. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी तीच कविता बोलून दाखवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोशल मीडियावर बोलताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या बाबत चुकीची भाषा वापरली. अंधारे यांनी दोन्ही सभागृहांचा अवमान आणि अपमान केला आहे, असा आरोप करत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच २६ मार्चला हक्कभंग मांडला.
सभापती राम शिंदे यांनी त्यानंतर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले होते. विशेषाधिकार समितीने २८ मार्चला हा हक्कभंग स्वीकारला असून कामरा आणि अंधारे यांना स्वतःची बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांत नोटीस बजावण्यात येणार आहे. सभागृहाबाहेरील व्यक्ती असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कामरा आणि अंधारे यांना कोणती शिक्षा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हक्कभंग सिद्ध झाल्यास शिक्षा काय?
विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. तसेच संबंधित व्यक्ती सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते. संबंधित व्यक्तीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. यानंतर त्याला समज देणे, ताकीद देणे, आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करून तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.





