Pune District : निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवणार

चाकण : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाकण येथे झालेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, युवक आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना मोहिते पाटील म्हणाले, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दिवस रात्र कष्ट केले अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी चोविस तास कायम उभा आहे. निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी माझी साथ कार्यकर्त्यांना मिळणारच. तसेच पक्ष नेतृत्वानेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबेगाव-जुन्नर तालुक्याच्या विकासावर टीका :-
मोहिते पाटील यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या विकासाबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटले की, पक्षाने चार वेळा मंत्रिपद देऊनही या भागाचाअपेक्षित विकास झालेला नाही. ज्यांच्या विरोधात गेली 20 वर्ष काम केले त्यांच्याच प्रचारासाठी स्टेज वर उभे राहावे लागले. अशा इतर पक्षातून आलेल्या आयत्या लोकांना आम्ही खपवून घेणार नाही. खेड तालुक्यातील महामार्ग, रिंगरोड, रेल्वे प्रकल्पांमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी बाधित झाल्या, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची अवस्था बिकट आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या वेदना समजून घ्याव्यात.कोणी त्यांच्या मागे उभे राहिले नाही तरी मी त्यांच्यासाठी कायम उभा राहणार.मी कार्यकर्त्यांचा बळी घेणाऱ्या मधला नाही. तालुक्यातील जनता हीच माझी खरी मोठी ताकद आहे.
दिलीप मोहिते मेळाव्यात बोलताना म्हणाले, चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या तीनही नगरपरिषद निवडणुक भारतीय जनता पक्षासोबत लढवणार असून, त्यांची सहकार्याची भूमिका असेल तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एकत्रितपणे लढवू , अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे ताकदीने निवडणूक लढवू.
पालकमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका :-
मोहिते पाटील म्हणाले, पालकमंत्री पक्षाचे असूनही कार्यकर्त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे, ही खंत आहे. तालुका पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने ताकतीने कामाला लागा असे मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले. मेळाव्याच्या शेवटी त्यांनी विरोधकांना इशारा देत म्हटले, विरोधकांनी जर माझ्या नादी लागले, तर कोणालाही सोडणार नाही.
मेळाव्यातील प्रमुख उपस्थिती:-
या मेळाव्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, सुरेखा मोहिते माजी जिल्हा परिषद सदस्य, कमल कड संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, अनिल बाबा राक्षे, गणेश बोत्रे, अरुण चांभारे , विनायक घुमटकर, नवनाथ होले, निलेश थिगळे,आशिष येळवंडे राम गोरे , मोबीन काझी, उपस्थित होते.





