Supriya Sule : शरद पवारांचा गट एनडीएसोबत जाणार का? सुप्रिया सुळे सस्पेन्स संपवला
Supriya Sule : मतदारसंघ पुनर्रचनेमुळे दाक्षिणात्य राज्यांवर मोठा अन्याय होईल, अशी भीती

Supriya Sule : आगामी संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या अत्यंत महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकाला पवार गट पाठिंबा देणार असल्याचे वृत्त समोर येत होते. या विधेयकासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे म्हंटले जाऊ लागले. अखेर या सर्व चर्चांचा सपेन्स शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुढे येत संपवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “महिला आरक्षणाचे विधेयक पूर्वीच एकमताने मंजूर झाले आहे. तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, आम्ही कोणतीही भूमिका मांडली नाही. अद्याप नवीन विधेयक आमच्याकडे आलेले नाही. ते विधेयक आमच्या हातात आले की आम्ही त्याचा सखोल अभ्यास करू आणि त्यानंतर २४ तासांत आमची अधिकृत भूमिका जाहीर करू.”
“आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा विसंवाद राहू नये, यासाठी मी स्वतः शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते सतेज पाटील, आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे. मी कोणत्याही इतर माध्यमांशी थेट संवाद साधला नव्हता, जे काही आहे ते मी आता अधिकृतपणे सांगत आहे. विधेयक समोर आला पाहिजे, मतदारसंघाचा फॉर्म्युला काय असेल हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत कोणतीही भूमिका घेणार नाही” असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या धोरणाबद्दल जी भूमिका मीडियात आली, ती सूत्रांच्या माध्यमातून..
तर सध्या शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, ” “आज सकाळपासून एका वर्तमानपत्रात आणि प्रसारमाध्यमात काही गोष्टी आल्या आहेत. अधिकृतपणे आमच्या पक्षाने कोणत्याही चॅनलशी काहीही भाष्य केलं नाही. पक्षाबद्दल, पक्षाच्या धोरणाबद्दल जी काही भूमिका मीडियात आली, ती सूत्रांच्या माध्यमातून आली आहे. आम्ही कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही. मी जे ऑन कॅमेरा सांगेल तेच सत्य आणि वास्तव आहे. Supriya Sule
संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी बोलावलेल्या विशेष बैठकीबाबत सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. अमित शाह यांनी सांगितले की, त्यांनी काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पक्षासोबत स्वतंत्र बैठक घेतली होती, ज्यातून वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे दाक्षिणात्य राज्यांवर मोठा अन्याय होईल, अशी भीती दक्षिण भारतातील राज्यांना वाटत आहे, जी योग्यच आहे.”
कोणत्याही राज्यावर अन्याय होता कामा नये, हीच आमची ठाम भूमिका
या बैठकीत लोकसंख्येऐवजी सरसकट ५० टक्के जागा वाढवण्याचा एक प्रस्ताव समोर आला होता. त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या प्रस्तावानुसार महाराष्ट्राच्या लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होतील, तर उत्तर प्रदेशच्या ८० वरून १२० जागा होतील. हा ५० टक्के जागा वाढीचा प्रस्ताव आम्हाला केवळ लोकसंख्यानिहाय रचनेपेक्षा अधिक चांगला आणि व्यवहार्य वाटला. कोणत्याही राज्यावर अन्याय होता कामा नये, हीच आमची ठाम भूमिका आहे. आम्ही याबाबत इंडिया आघाडीत चर्चा करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.” Supriya Sule
हेही वाचा:






