शंकरराव गडाख ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नेवासा : नेवासा मतदार संघात सध्या राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या संभाव्य पक्ष बदलाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोबत आपली निष्ठा कायम असल्याचे अनेक वेळा जाहीरपणे सांगणारे गडाख आता शिंदे गटात सामील होणार असल्याच्या वावड्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनच उडवल्या जात आहेत.
गडाख यांचे संस्थेवर सुरू असलेल्या चौकशा थांबविण्यासाठी त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी दाखवली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या चर्चेला बळ देणारे प्रामुख्याने महायुतीचेच कार्यकर्ते आहेत, ज्यामुळे या चर्चांमध्ये कितपत सत्यता आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरीही, या चर्चेमुळे नेवासा मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे.
महायुतीतचं स्पर्धा
महायुतीमध्ये सध्या भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे देखील पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्यासह काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते देखील अंतिम उमेदवार कोण असेल, यावर चर्चा करत आहेत. भाजपमध्येच अंतर्गत बंडाळी सुरू असून, सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, माऊली पेचे हे देखील उमेदवारीसाठी जोर लावत आहेत.
महाविकास आघाडीत गडाखांची भूमिका
महाविकास आघाडीमध्ये गडाख यांची उमेदवारी देखील सस्पेन्समध्ये आहे. गडाख अपक्ष म्हणून निवडणूक लढणार की शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या चिन्हावर, याबद्दल अद्यापही स्पष्टता नाही. महाविकास आघाडीकडून देखील त्यांना अपक्ष म्हणून मान्यता मिळेल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
राजकीय तिढा
गडाख यांच्या संभाव्य पक्ष बदलाच्या चर्चांमुळे नेवासा तालुक्याच्या राजकारणात एक वेगळे वळण आले आहे. या चर्चांमुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, कारण जर गडाख महायुतीमध्ये आले तर त्यांचा राजकीय प्रभाव अधिक वाढू शकतो.
सध्या या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या चर्चांमुळे नेवासा मतदार संघात राजकीय वातावरण तापलेले असून, गडाख यांच्या पुढील राजकीय डावपेचांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





