नांदगावमधून समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवणार? छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal | नांदगाव विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार समीर भुजबळ निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आला आणि येथून विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले समीर भुजबळ शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहेत. यातच आता समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून लवकरच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज मंत्री छगन भुजबळ येवला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांना समीर भुजबळ यांच्या अपक्ष लढण्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले. त्यावर समीर भुजबळ हे त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ ?
छगन भुजबळ म्हणाले की, “समीर भुजबळ महाविकास आघाडीकडून लढणार हे कधी बोलले. समीर भुजबळ हे अपक्ष लढणार असल्याची केवळ बातमी आहे. तुतारीकडे जाणार, मशालकडे जाणार ही चर्चा तुम्हीच केली होती तो आहे तिथेच आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तो उपस्थित राहणार आहे. तो अपक्ष लढणार हे मला सांगितले नाही. ते स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “मी 1985 पासून विधानभवनात आहे. तुमच्या आशीर्वादाने आणखी पाच वर्ष बसणार आहे. लोकसभेच्या वेळी महायुतीला फार मोठा सेटबॅक बसला. मात्र नंतरच्या काळात महायुतीने फार मोठी आघाडी घेतली. आता आमची खात्री झाली आहे की, महायुतीचं शासन पुन्हा एकदा येईल,” असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. Chhagan Bhujbal |
हेही वाचा:
आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटलांसह ‘हे’ दिग्गज नेते मंडळी आजच भरणार उमेदवारी अर्ज !





