Rupali Chakankar: रुपाली चाकणकर राजीनामा देणार का? ‘त्या’ अशोक खरातचे केले पाद्यपूजन; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण…
Rupali Chakankar: महिला आयोगाच्या अध्यक्षा खरातच्या संस्थेवर सदस्या; सुषमा अंधारे, वडेट्टीवार, दमानिया यांनी मागितला राजीनामा.. चाकणकर म्हणाल्या, आरोपांबाबत मला कल्पना नव्हती

Rupali Chakankar: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चाकणकर यांनी याच अशोक खरातचे पाद्यपूजन केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली आहे.
अशोक खरात प्रकरण काय आहे?
अशोक खरात हा निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असून गेल्या काही वर्षांपासून तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाऊ लागला होता. अनेक मोठे राजकीय नेते, अधिकारी आणि कलाकार मंडळी त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असत. मात्र, नाशिकमधील एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने १८ मार्च रोजी पहाटे ३ वाजता त्याला अटक केली. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राइव्ह जप्त केला असून त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चाकणकर आणि खरात यांचा संबंध काय?
अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या एका फोटोत अशोक खरात यांच्या ‘श्री शिवनिका संस्थान, मिरगांव’ या संस्थेत रुपाली चाकणकर यांचे नाव सदस्या म्हणून नमूद असल्याचे दिसते. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की, चाकणकर या खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत होत्या. खरातच्या घरच्या लग्न कार्यातही चाकणकर जातीने उपस्थित होत्या.
विरोधकांनी साधला एकत्रित निशाणा –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले, “महिला आयोगाच्या अध्यक्षा अशोक खरातची पाद्यपूजा करत आहेत, त्यांची सेवा करत आहेत. आता तरी त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.” उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चाकणकर यांचा राजीनामा घेणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
*महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही!*
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशोक खरातसारख्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचे पाय धुणे अत्यंत लाजिरवाणे आहे.… pic.twitter.com/ehhDJ4cGlN
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 18, 2026
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाचे पाय धुणे अत्यंत लाजिरवाणे आहे. अशा अध्यक्षांकडून राज्यातील महिलांना न्याय मिळणार कसा? एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणवायचे, इतरांना संविधान वाचण्याचे उपदेश द्यायचे आणि दुसरीकडे भोंदू बाबाचे पाय धुवायचे — हेच का यांचे पुरोगामीत्व?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली…..
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती… pic.twitter.com/kQNGznfsos— SushmaTai Andhare (@andharesushama) March 18, 2026
सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, यापूर्वीही अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते, तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. “महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा लिंगपिसाट माणसासाठी छत्री घेऊन उभ्या आहेत,” असे त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही त्यांनी थेट सवाल केला की, “महिला म्हणून त्यांच्या मनाला हे पटते का?”
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही फोटो व व्हिडिओ शेअर करत सवाल केला, “बलात्काराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीचे महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतानाचे व्हिडिओ?” खरातबाबत प्रचंड माहिती आपल्यापर्यंत येत असून लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.
बलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरतांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ ? खूप वर्ष त्यांना ह्या ओळखतात? त्यांच्या संघटनेवर ? त्यावर पदाचा पण उल्लेख.
ह्या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे. लवकरच खुलासा करेन pic.twitter.com/TXClTdnxHY
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 18, 2026
चाकणकर यांची प्रतिक्रिया –
या सर्व आरोपांवर रुपाली चाकणकर यांनी सांगितले, “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून तिथे सामाजिक कार्यक्रम होतात. सामाजिक कामांच्या निमित्ताने अनेक प्रतिष्ठित व्यक्तींसह आम्हीही ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत किंवा त्यांच्यावरील आरोपांबाबत मला कल्पना नव्हती. पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील आणि पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे.”





