रवींद्र धंगेकरांची विधान परिषदेवर वर्णी लागणार का? शिवसेनेकडून कोणती ऑफर देण्यात आली? म्हणाले…

Ravindra Dhangekar | काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या धंगेकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहे. धंगेकर यांनी काँग्रेस सोडल्याने आता शिंदे गटाकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. लवकरच या जागांसाठी निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून विधान परिषदेवर धंगेकर यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरच धंगेकर यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने या चर्चांना वेग आला आहे.
विधान परिषदेतील पाचही जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीतील घटक पक्ष असलेले भाजपला 3, शिवसेनेला (शिंदे गट) 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) 1 जागा मिळू शकते. यातील शिंदे गटाकडून धंगेकरांची वर्णी लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, पुण्यातून भाजप नेते जगदीश मुळीक, अजित पवार गटाचे दीपक मानकर या नेत्यांची नावं देखील विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत.
विधान परिषदेसाठी 27 मार्चला मतदान पार पडणार आहे. 17 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर 0 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
दरम्यान, पक्ष सोडताना शिंदे गटाकडून काही आश्वासन देण्यात आले का? या प्रश्नावर बोलताना धंगेकर म्हणाले की, मी विधान परिषद , विधानसभा किंवा म्हाडा मागितल्याच्या बातम्या आल्या. पण, असं मी शिंदेंना काहीही मागितलेलं नाहीये. मी कोणत्याही पक्षात असलो तरी माझ्याकडे मानवता धर्म आहे. जात-पात न मानणारा मी कार्यकर्ता आहे, असे ते म्हणाले.





