Raj Thackeray & Uddhav Thackeray : “राज-उद्धव एकत्र येणार? चंदूमामांचं मोठं विधान, 80 टक्के शक्यता केली व्यक्त

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या दोन्ही नेत्यांमधील तणाव मिटून एकत्र यायची शक्यता निर्माण झाली असून, सध्या राजकीय वर्तुळात सकारात्मक हालचाली सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. विशेषतः ठाकरे कुटुंबातील चंदूमामा म्हणजेच चंद्रकांत वैद्य यांनी केलेल्या वक्तव्यानं या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.
मुंबईतील एका लग्नसोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या नेत्यांमध्ये झालेलं शेकहँड, हास्यविनोद आणि एकाच फ्रेममध्ये फोटोसेशन यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सध्या वाऱ्याची दिशा बदलतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुनील प्रभू (शिवसेना) आणि नितीन सरदेसाई (मनसे) यांचं हस्तांदोलन, तर विशाखा राऊत व बाळा नांदगावकर यांचं फोटोसेशन, या घडामोडींनी चर्चांना नवा आयाम दिला आहे.
चंद्रकांत वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “राज आणि उद्धव दोघेही माझे भाचे. मी अनेक वर्षांपासून त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्याच्या घडीला चर्चेची दिशा सकारात्मक आहे. ईश्वर अशा प्रयत्नांना कधी वाया जाऊ देत नाही.” त्यांनी जोरदार आशा व्यक्त करत म्हटलं की, “हीच योग्य वेळ आहे दोघांनी आणि त्यांच्या पुढच्या पिढीनं आदित्य आणि अमितनं एकत्र येण्यासाठी.” असं चंद्रकांत वैद्य यांनी म्हंटल आहे.
विशेषतः संजय राऊत यांच्या भूमिकेचं कौतुक करत वैद्य म्हणाले, “अशक्य गोष्टी शक्य करण्यात संजय राऊत यांचा हातखंडा आहे. त्यांचा दृष्टिकोनही सकारात्मक आहे.”
“मी कधीही या विषयावर थेट दोघांशी बोलत नाही, पण मला खात्री आहे की त्यांच्या मनात याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.” त्यांनी असं स्पष्ट केलं की, निवडणुकीसाठी नव्हे, तर “मराठी माणसाच्या हक्कासाठी राज-उद्धव यांना एकत्र यावं लागेल.” असंही वैद्य यांनी यावेळी सांगितलं.
शेवटी त्यांनी सांगितलं, “मनापासून मला 100% ते एकत्र यावं असं वाटतं, पण वास्तवात निदान 80% तरी शक्यता आहे. मराठी माणसासाठी हे एक आश्वासक आणि गरजेचं पाऊल ठरेल.” असं चंद्रकांत वैद्य म्हणाले.




