दसऱ्यानंतर रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार? महायुतीमधील ‘या’ बड्या नेत्याचं मोठं विधान

Raigad Guardian Minister : राज्यात महायुतीची सत्ता येऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडविण्यात अजूनही यश आलेले नाही. अशातच पुन्हा एकदा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे नेते व मंत्री भरत गोगावलेंनी दावा केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना दसऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असल्याचे संकेत दिले आहे.
२० सप्टेंबर शनिवारी चिपळूनमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवरात्रीनंतर म्हणजेच दसऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल, मी देवीचा खरंच भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल असा मोठा दावा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काय म्हणाले भरत गोगावले?
नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल. मी देवीला साकडे घालणार असल्याचे गोगावले म्हणाले. मी खरंच देवीचा भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी माझा हट्ट नाही, पण काही गोष्टींमुळं मी त्यासाठी आग्रही आहे. जो हक्क आहे, तो का सोडावा? असा सवालही भरत गोगावलेंनी उपस्थित केला आहे.
संजय राऊतांवर हल्लाबोल
शिवसेना शिंदे पक्षाकडून जाहिरातींवर व बॅनरवर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात येत आहे. ते जिल्हाध्यक्ष होते, असं विधान उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यानंतर फोटोवरून राजकारण चांगलंच तापलं असून, मंत्री भरत गोगावले यांनी यावरून खासदार संजय राऊतांना लक्ष्य केलं.





